माळवाडी पुनावळे येथे साडेदहा लाखांची घरफोडी; सोने चांदीसह रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

0
521

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – शिर्डीला देव दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताच्या घरात अज्ञात चोट्यांनी तब्बल १० लाख ६५ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. यामध्ये सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. ही घटना बुधवार (दि.२९) सकाळी साडेसात ते रात्री पावणेदहाच्या सुमारास पुनावळे माळवाडी, विजयनगर सर्व्हे क्र. ४४/४/३  येथील घरात घडली.

याप्रकरणी  गितेश प्रकाश बोरगे (वय २६, रा. सर्व्हे क्र. ४४/४/३, पुनावळे माळवाडी, विजयनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गितेश पुनावळे हे त्यांच्या कुटुंबासोबत बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. दरम्यान त्यांच्या घराला दोन कुलुपे लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दोन्ही कुलुपे बनावट चावीच्या साह्याने उघडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले साडेतेहतीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १० लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गितेश रात्री पावणेदहाच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलिसात याबाबतची माहिती दिली. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.