हिंजवडी शिवाजी चौकातील वाहतुक व्यवस्थेत बदलाचा अंतिम आदेश जाहिर

0
2401

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – हिंजवडी शिवाजी चौकातील वाहतुक सुरळीत आणि सुरक्षीत करण्यासाठी वाहतुक व्यवस्थेत अंतिम बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश आज (सोमवार) पिंपरी-चिंचवडचे अप्पर  पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढला आहे.

या आदेशामध्ये शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज-१ ते जॉमेट्रीक सर्कल चौक ते शिवाजी चौक अशी चक्राकार एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दरम्यान, चक्राकार वाहतुकीमध्ये पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि आग्निशमन दलाचे बंब यांना निर्बंध लागू नसतील, असे आदेशात स्पष्ट केले आहे. सध्याच्या चक्राकार एकेरी वाहतूक मार्गावर पूर्वीचे काही निर्बंध असतील, तर ते देखील रद्द करण्यात आले आहेत.

अंतिम स्वरुपात वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल पुढील प्रमाणे –

* शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास आणि यु-टर्न घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

* शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रोसर्कल फेज-१ येथून उजवीकडे वळून जॉमेट्रीक सर्कल चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांनी इच्छित स्थळी जावे.

* शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसेस व इतर सर्व जड वाहनांना वाकड ब्रिजकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. आयटी कंपन्याच्या बसेस व अवजड वाहनांनी शिवाजी चौकातुन डावीकडे वळुन कस्तूरी चौकातून उजवडीकडे वळुन इंडीयन ऑईल चौकातून इच्छित स्थळी जावे (या ठिकाणी पीएमपीएमल बसेस आणि अग्नीशामक दलाची वाहने व इतर महत्वाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे)

* जांभुळकर जिम/शेल पेट्रोलपंपा जवळील डिवायडर पंक्चर हा स्थानिक नागरीकांसाठी कायमस्वरुपी खुला ठेवण्यात येणार आहे.

* इंडयन ऑईल पंप ते शिवाजी चौक दरम्यान असलेला डी-मार्ट येथील डिव्हायडर पंक्चर, शिवाजी चौक ते फेज-१ सर्कल येथील पाच डिव्हायडर पंक्चर फेज१ चौक ते जॉमेट्रीक सर्कल चौक दरम्यानचे सर्व डिव्हायडर पंक्चर आणि मेझा-९ चौक ते शिवाजी चौका दरम्यानचे तिनही डिव्हायडर पंक्चर बंद करण्यात येत आहेत. तसेच जॉमेट्रीक सर्कल ते विप्रो सर्कल फेज-२ चौक दरम्यानच्या सर्व डिव्हायडर पंक्चर बंद करण्यात येत आहेत.

* भुमकर चौकातुन येणाऱ्या वाहनांना शिवाजी चौकातुन उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्या वाहनांनी शिवाजी चौकातुन सरळ विप्रोसर्कल फेज-१ येथुन इच्छित स्थळी जावे.

* माणगाव रोडवरुन येणाऱ्या वाहनांना विप्रोसर्कल फेज-१ चौकातुन शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या सर्व वाहनांनी डावीकडे वळुन जॉमेट्रीक सर्कल येथुन इच्छित स्थळी जावे.

* मेझा-१ चौकातुन सर्व वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्या सर्व वाहनांनी डावीकडे वळुन शिवाजी चौकातुन इच्छित स्थळी जावे.

* फेज-२ आणि फेज-३ कडुन येणाऱ्या सर्व वाहनांना जॉमेट्रीक सर्कल चौकातुन उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. जड वाहना व्यतिरिक्त सर्व वाहनांनी सरळ शिवाजी चौकातुन इच्छित स्थळी जावे.