सर्वाधिक ४५ संख्याबळ आमच्याकडे, आता राजीनामा द्यायचा की नाही ते त्यांनी ठरवावे – एकनाथ शिंदे

0
255

गुवाहाटी (आसाम), दि. २२ (पीसीबी) – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलत होते.

“आम्ही सर्व आमदार आता एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्हा सर्वांची तीच भावना आहे. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल”, असे ते म्हणाले. शिवसेना आमदाराला मारहाण झाल्याचा दावा केला जात असताना त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “गुजरातमध्ये कोणत्याही आमदारांना मारहाण केली नाही. त्यांना परत पाठवताना कार्यकर्तेही त्यांच्या बरोबर दिले होते”, असेही ते म्हणाले.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहोचल्यानंतर जाहीर केलं होतं. त्यानंतरपासूनच महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतरच त्यांनी हे ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? ते पक्ष सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.