पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला रसातळाला पोहोचवून डॉ. अमोल कोल्हे आता राष्ट्रवादीत!

0
1116

मुंबई, दि. १ (पीसीबी) – छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी (दि. १) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते व आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख होते. त्यांच्याच पदाच्या काळात शिवसेना शहरात रसातळाला पोहोचली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले होते.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवाजी महाराजांच्या विचाराचे बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या वेळी दिली होती. ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यानंतर त्यांच्याकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, त्यांच्या या पदाच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना रसातळाला गेली.