हैदराबाद लोकसभा मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी विरूद्ध अझरूद्दीन सामना होण्याची शक्यता

0
969

हैदराबाद, दि. १ (पीसीबी) – एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भारतीय संघाचे माजी कप्तान अझरूद्दीन काँग्रेसकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा असदुद्दीन ओवेसी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात ओवेसी आणि अझरूद्दीन एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

अझरूद्दीन हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांची गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रदेश काँग्रेस कार्यकारी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ते हैदराबादचे रहिवासी आहेत. ते सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, भाजपचे नेते बंडारू दत्तात्रय यांचे या मतदारसंघात मोठे प्रस्थ असल्याने काँग्रेस अझरूद्दीन यांना सिकंदराबादमधून मैदानात उतरवण्याचा धेका पत्करण्यास तयार नाही.

आता त्यांचे नाव हैदराबाद मतदारसंघातून घेतले जात आहे. हा मतदारसंघ एमआयएमचा गड मानला जातो. खासदार असदुद्दीन ओवेसी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पक्षश्रेष्ठींनी लढण्याची सूचना केल्यास अझरूद्दीन हे ओवेसी यांच्यासमोर उभे ठाकतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. अझरूद्दीन हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. परंतु, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते राजस्थानच्या टोंक माधोपूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले.