पनवेलचा पाणी प्रश्न, शास्तीकर व वाढीव कराची समस्या लवकरच सुटणार – खासदार बारणे

0
40

पनवेल येथे बाईक रॅली व बारणे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आत्तापर्यंत मोदी कारकिर्दीचा ट्रेलर, यापुढे खरा चित्रपट – प्रशांत ठाकूर

पनवेल, दि. 26 एप्रिल – पनवेल शहराचा पाणी प्रश्न तसेच शास्ती कर व वाढीव कराचा विषय येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाली निघालेला असेल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काल (गुरुवारी) दिली.

पनवेल शहरातून भव्य बाईक रॅली काढून खासदार बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोळीवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत बारणे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील तसेच अनिल भगत, अरुण भगत, परेश ठाकूर, रुपेश ठोंबरे तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात पनवेल परिसरात अनेक विकास कामे करता आली याचा आनंद आहे. काही कामे प्रलंबित आहेत, याची मला जाणीव आहे. पण केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे ते प्रश्नही विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडवलेले असतील.

एकविरा देवस्थान विकास प्राधिकरण

पनवेल परिसरात रस्त्यांचे जाळे, रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकवीरा देवस्थानच्या विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नमस्कार त्यांनी 69 कोटींचा निधी मंजूर केला. देवस्थान विकास प्राधिकरणाचा दर्जा देखील देण्यात आला आहे. कार्ला गडाच्या विकासाचा आराखडा बनवण्यात आला असून लवकरच त्या ठिकाणी मोठे वाहनतळ, रोपवेसह विविध सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतील, असे बारणे यांनी सांगितले.

आठ पदरी जेएनपीटी रोड, अटल सेतू, मिसिंग लिंक, आदिवासी गावांना रस्ते व वीज, मेट्रो, लोहमार्ग विकास, रेल्वे स्थानकांचा विकास, पासपोर्ट कार्यालय अशा विविध विकास कामांचा आढावा भरणे यांनी यावेळी सादर केला.

‘मोदींचा ट्रेलर पाहिलात, आता चित्रपट पाहा’

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेले काम म्हणजे केवळ ट्रेलर होता, आता खऱ्या चित्रपटाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लोकांनी मनात खूणगाठ बांधून ठेवली आहे. जास्तीत-जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे, एवढेच काम आपल्याला करायचे आहे. प्रत्येक बुथवर किमान 200 मतांची आघाडी मिळवली तरी खासदार बारणे यांना पनवेल मधून विक्रमी मताधिक्य मिळेल. यापुढेही खासदार बारणे हे पनवेल साठी जास्तीत जास्त विकास निधी देतील.

बाईक रॅलीतून युवकांचे शक्ती प्रदर्शन

पनवेल येथे महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला खासदार बारणे व आमदार ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीला प्रारंभ झाला. महायुतीच्या विविध पक्षांचे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह घेऊन शेकडो युवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदार बारणे विजय रथावर आरुढ होऊन कोळीवाडा येथे सभास्थानी दाखल झाले. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. मतदारांना अभिवादन करत बारणे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.‌

नावडे येथे चौकसभा

पनवेलमध्ये येण्यापूर्वी नावडे फेज टू येथे खासदार बारणे व आमदार ठाकूर यांनी कोपरा सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा व लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे स्त्रीशक्तीला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे, असे बारणे म्हणाले. सिडको, एमएमआरडीए यांच्याशी संबंधित प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.

केंद्रातील मोदी सरकार हे लोकहिताचे काम करणारे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे सरकार पुन्हा निवडून देण्याची आपल्याला संधी आहे, असे आमदार ठाकूर म्हणाले. खासदार बारणे हे विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करतात. त्यांच्यामुळेच अनेक प्रकल्प पनवेल परिसरात झाल्याचे ठाकूर यांनी आवर्जून सांगितले.

‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’, खिच के ताण, धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता