शिवप्रतापदिनाच्या मुहूर्तावर अफलखानाच्या कबरीभोवतालचे अवैध बांधकाम सपाट

0
216

सातारा, दि. १० (पीसीबी) : छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाला सुरूवात झाली आहे. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात येत आहे.

अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावे अशी शिवप्रेमींची मागणी होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येत होता त्यावरून देखील अनेकदा वाद झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता.

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मात्र आज अखेर पोलीस, महसूल विभाग आणि वनविभागाकडून बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पहाटे 5.30 वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सध्या हे काम सुरू असून मोठा पोलिस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. 10 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवप्रेमींकडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शिवभक्तांसाठी ही अभिनानाची गोष्ट आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल, अशी भावना शिवप्रेमींनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. शिव प्रताप दिन हा दिवस मोठ्या उत्साहात म्हणून साजरा केला जातो. शिवप्रताप दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रतापगडावरती माथा टेकण्यासाठी येत असतात. मात्र आज कारवाईमुळे संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.