शहरातील ‘हॉटेलिंग’ही महागणार; 1 जून पासून दरात 10 टक्क्यांनी वाढ..

0
341

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेलिंगही आता महागणार आहे. गॅस सिलेंडरसह वाढत्या महागाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी 1 जून 2022 पासून हॉटेलच्या दरांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोशिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, गोविंद पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

हॉटेल असोशिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशातील, राज्यातील इंधन, गॅस सिलेंडरची दरवाढ, सीएनजी दरातील वाढ, विद्युत दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आबे. अनेक राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या करांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. कोरोनानंतरचा नाजूक काळ लक्षात घेता महागाई आकाशाला भिडलेली आहे. वाहतुकीच्या दरात प्रचंड दरवाढ झाली. मालवाहतुक महागली आहे. हॉटेल व्यावसायिकांना कारागीर, मजूर उपलब्ध होणे अवघड झाले आहे. याबाबत न्याय मिळवण्यासाठी केंद्र, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे उपाययोजनाची मागणी करत आहोत. तथापि, प्राप्त परिस्थितीत कच्या मालाच्या दरवाढीसह सर्व बाबींचा विचार पूर्वीच्या दराने देणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे 1 जून 2022 पासून पिंपरी-चिंचवड हॉटेल मधील सर्व व्यावसायिक सध्याच्या दरामध्ये 10 टक्क्यांनी वाढ करणार आहे.