व्यवसायात गुंतवणुक केल्यास २० टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिला पोलीस व तिच्या पतीकडून १९ लाखाचा गंडा

0
181

 पुणे, दि. १० (पीसीबी)- व्यवसायात गुंतवणुक केल्यास २० टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला महिला पोलीस व तिच्या पतीने तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सदाशिव नलावडे (वय ५२, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १३९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिला पोलीस कर्मचारी ज्योती शंकर गायकवाड (वय ५०) आणि तिचे पती शंकर लक्ष्मण गायकवाड (वय ५४, दोघे रा. रास्ता पेठ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ मे २०२१ ते २८ मार्च २०२२ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलावडे यांचा चारचाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तर गायकवाड याचा श्रेया टुर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. ज्योती गायकवाड या सध्या पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूकीला आहे. गाड्याच्या दुरुस्तीसाठी गायकवाड फिर्यादी यांच्याकडे येत होते. त्यातून त्यांचा परिचय झाला होता. २०१९ मध्ये आरोपींनी नलावडे यांच्या कार्यालयात येऊन त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास सांगितले. तुम्ही गुंतवलेल्या पैशाने नविन इन्होवा किंवा नवीन चारचाकी गाडी घेऊन व तुमच्या आर्थिक गुंतवणुकीपोटी अत्यंत कमी कालावधीत तुम्हाला दरमहा २० टक्के आर्थिक मोबदला आम्ही देऊ असे सांगितले. पत्नी पोलीस खात्यात असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या ओळखी आहेत. त्यामुळे उधारी पाधारीचा काही एक त्रास होत नाही.

पोलीस आमच्याच गाड्या वापरतात, असे म्हणून त्यांनी मोठ् मोठ्या पोलीस अधिकार्‍यांना मुद्दामहून फोन लावून आपण कोणा कोणास कसा त्रास देऊन कसे पैसे वसुल केले, याची माहिती दिली. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांना वेळोवेळी १९ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर फेबु्वारी २०२२ पासून गायकवाड हा त्यांना टाळू लागला. त्याने कबुल केल्याप्रमाणे नवीन गाड्या घेतल्याच नाही,
असा संशय आल्याने फिर्यादी त्याच्या घरी गेले.
मुलाचे लग्न असल्याने मला पैशांची गरज असल्याने सांगून पैसे परत मागितले. तरी त्याने पैसे दिले नाहीत.
तेव्हा फिर्यादी यांनी आता आम्ही पोलिसास जातो, असे आरोपीला सांगितल्यावर त्याने धनादेश दिला.

पण तो न वटताच परत आला. त्यानंतर त्याने वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून दिलेले सर्व धनादेश परत आले.
त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु आरोपी हे घरास कुलूप लावून निघून गेल्याची माहिती मिळाली.
त्यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन पाहिले असता घर बंद होते. दुकानावर महिंद्रा बँकेची जप्तीची नोटीस लावल्याचे त्यांना आढळून आले.
त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला़ परंतु, पोलिसांनी तक्रार न घेतल्याने शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.