विनायक मेटे २५ वर्षे आमदार

0
273

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांचं निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मेटेंच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरक्षणासाठी सातत्यानं आवाज उठवणारे आणि त्यासाठी निकरानं लढा देणारे नेते, अशी विनायक मेटे यांची ओळख होती.विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्र स्मारक समितेचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. विनायक मेटे कोण आहेत?

विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते.मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायक मेटे सामाजिक चळवळीत उतरले. 1994च्या निवडणुकीत मराठा महासंघाने तत्कालिन युतीला पाठींबा दिला होता. शिवसेना- भाजप युती सरकार आल्यानंतर विधान परिषदेवर विनायक मेटे यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांचं युतीशी बिनसल आणि त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन केला. त्यानंतर राष्ट्रवादीनेही 2 वेळा विधान परिषदेवर संधी दिली. या काळातही मेटे सत्ताधारी पक्षातील आमदार होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील केला. यानंतरही भाजप सत्तेत आला. पक्षांतरामुळे त्यांची गेलेल्या आमदारकीची अर्धी टर्म त्यांना भाजपने दिली. त्यानंतर भाजपनं पुन्हा त्यांना संधी दिली. आताचा अडीच वर्षांचा काळ सोडता विनायक मेटे आमदारही होते आणि विशेष म्हणजे सत्तेतही असत. 2014 सालापासून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सुरुवात केली. तेव्हा भाजप लाट असतानाही त्यांनाच बीडमधून पराभव पत्करावा लागला. तर 2017च्या नगर पालिका निवडणुकीत बीडमध्ये त्यांच्या शिवसंग्रामच्या उमेदवारांचा पुरता पाडाव झाला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाने चांगली चमक दाखवली. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामला सत्ताही मिळाली. नंतर मात्र चारही जिल्हा परिषद सदस्य व तीन पंचायत समिती सदस्य त्यांना सोडून गेले. भाजप, राष्ट्रवादी आणि आता पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या मेटेंची उठबस कायम बड्या नेत्यांमध्ये राहिली. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले.

विनायक मेटेंच्या निधनानंतर बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, “समाजासाठी परखड भूमिका मांडणारे एकमेव आमदार होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. समाजाला न्याय मिळावा, ही मेटे यांना खरी श्रद्धांजली असेल.”