विधीमंडळाने काढलं अधिकृत पत्र; बहुमत चाचणी उद्याच होणार?

0
217

मुंबई,दि.२९(पीसीबी) – राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारचं काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करा असं सांगितलं आहे. त्यानंतर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अशातच बहुमत चाचणीसाठी आता विधीमंडळाने अधिकृत पत्र काढलं आहे. उद्या म्हणजेच गुरूवारी बहुमत चाचणी घेतली जाईल अशा स्वरुपाचं पत्र आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी राज्यपालांकडे पत्रकाद्वारे केली होती. दरम्यान फडणवीस यांच्या मागणीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं.

या पत्रात त्यांनी ‘महाराष्ट्रातील राजकीय चित्र व्यथित करणारं आहे. वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून असं दिसंतय की, शिवसेनेच्या ३९ आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका आहे. त्याचबरोबर राजभवनाला ७ अपक्ष आमदारांनीही पत्र पाठवलं असून, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात बहुमत गमावलं असून, लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्यात यावी’. असं म्हटलं होतं.

‘विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही माझी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावलं आहे. लोकशाही विरोधी गोष्टी होऊ नये म्हणून लवकर बहुमत चाचणी घेण्याचं त्यांनी दिलेल्या पत्रात आहे.

विधीमंडळाने काढलं अधिकृत पत्र जशाच तसं
मुंबई दि. २९ जून महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे. सर्व सन्माननीय विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. माननीय राज्यपाल महोदयांच्या निदेशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आले आहे.