राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या डॉक्टर अर्चना पाटील भाजपमध्ये

0
439

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काहीही करून बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा असा प्रण केला आहे. त्याची सुरुवात ही जोरात सुरू आहे. नुकत्याच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन दिवसांचा बारामती मतदारसंघ दौरा पूर्ण केला. त्यानंतर आता भाजपच्या मिशन बारामतीला आणखी बळ मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉक्टर अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांनी जाहीर प्रवेश केला.

डॉक्टर अर्चना पाटील या इंदापूर तालुक्यातील लासुरने गावच्या रहिवासी आहेत. लासुरने घराणे हे इंदापूर तालुक्यातील बडे प्रस्थ मानले जाते. डॉक्टर अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील हे माजी खासदार शंकराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढले होते. यावेळी त्यांचा अवघा थोड्या मतानेच पराभव झाला होता. त्यामुळे अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशाने हर्षवर्धन पाटील यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
अर्चना पाटील यांची राष्ट्रवादीचा काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. याशिवाय इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी भोर, वेल्हा, दौंड, पुरंदर, इंदापूर, बारामती या बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांचे त्यांनी दौरे केले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षक पदी डॉक्टर अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती.