कुंभमेळ्यातील मोठा घोळ उघड, 35 कोटींची बनावट वर्कऑर्डर

0
2

दि.३०(पीसीबी)- २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या नियोजनाला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी वापरून त्र्यंबकेश्वर-कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे तब्बल ३५ कोटी रुपयांचे बनावट वर्कऑर्डर काढण्यात आले. हे कार्यादेश कुंभमेळा क्षेत्रातील सीसीटीव्ही सर्वेक्षण, यंत्रणा कार्यान्वित करणे आणि त्यांच्या देखभालीच्या कामांसाठी थेट पद्धतीने देण्यात आले होते.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी करून ‘इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे’ या संस्थेच्या नावे खोटा कार्यादेश तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतः आयुक्तांनीच ही बनावट सही पकडल्याने या मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड झाला. याप्रकरणी आयुक्तांचे स्वीय सहायक विजय गोरख सोनवणे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली असून, आता यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात २८ एप्रिल रोजी नीळकंठ शेवाळे नावाचा व्यक्ती दोन संशयास्पद पत्रे घेऊन आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (नांदेड) गजानन पाटील-चव्हाण यांनी ही पत्रे दिल्याचे त्याने सांगितले. मात्र, कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे सहाय्यक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांना पत्राचा मजकूर, मार्जिन आणि स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने त्यांनी तात्काळ ही पत्रे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्याकडे पडताळणीसाठी सादर केली.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सतर्कतेमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे बनावट कार्यादेश तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. डॉ. गेडाम यांनी संबंधित पत्रांची बारकाईने तपासणी केली असता, त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमधील एका चुकीमुळे हा बनावटगिरीचा प्रकार समोर आला. आयुक्त गेडाम यांच्या अधिकृत डिजिटल स्वाक्षरीत ‘Praveen’ असे स्पेलिंग असताना, बनावट पत्रांवर मात्र ‘Pravin’ असे स्पेलिंग आढळले. ही सूक्ष्म चूक त्यांच्या नजरेतून सुटली नाही आणि ती स्वाक्षरी आपली नसल्याचे त्यांच्या तात्काळ लक्षात आले. यावरून अज्ञात संशयितांनी डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट कार्यादेशांद्वारे शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.