राम भोसले यांनी स्वीकारला ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीट’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार

0
295

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीटचे नवे अध्यक्ष राम भोसले व त्यांच्या संचालक मंडळाने बुधवारी एका शानदार समारंभात पदग्रहण केले. क्लबचे सचिव म्हणून आनंद सूर्यवंशी यांनी कार्यभार स्वीकारला.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण समारंभ झाला. त्यावेळी माजी प्रांतपाल मोहन पालेशा व प्रशांत देशमुख, प्रांत अधिकारी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील अनेक क्लबचे अध्यक्ष व अधिकारी तसेच पिंपरी एलिट क्लबचे मावळते अध्यक्ष रवींद्र भावे, नियोजित अध्यक्ष अशोक शिंदे, बाळासाहेब उ-हे हेही उपस्थित होते.

क्लबच्या नवीन कार्यकारिणीत रवींद्र भावे (प्रकल्प संचालक), अनिल नेवाळे (क्लब ट्रेनर), सुनील होळ (सहसचिव व आयटी ऑफिसर), वैशाली नेवाळे (क्लब प्रशासन संचालक), जसबिंदर सिंग (खजिनदार), रश्मी भावे (संचालक इव्हेंट), अभिजित शाह (सदस्यता संचालक), सदाशिव काळे (ऑनगोइंग प्रोजेक्ट / हैप्पी व्हिलेज), विनय कानेटकर (जनसंपर्क संचालक), मिता ठाकूर (न्यू युथ संचालक), पांडुरंग विभुते (सीएसआर संचालक), सागर अहिवळे (निधी संकलन संचालक), शीतल अर्जुनवाडकर (स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग अँड ब्रॅण्डिंग), इरफान आवटे (टीआरएफ संचालक) व चिंतामणी अभ्यंकर (सार्जंट ऍट आर्म्स) यांचा समावेश आहे.

इरफान आवटे यांनी प्रांतपाल परमार यांना रोटरी इंटरनॅशनलसाठी चार लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. शीतल अर्जुनवाडकर यांना रोटरी इंटरनॅशनलच्या पॉल हर्रीस फेलोशिप (पीएचएफ) पिन देऊन सन्मानित करण्यात आले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी क्लबची मासिक पत्रिका व डायरीचे प्रकाशन केले.डॉ. परमार म्हणाले की, “माणसाने मोठी स्वप्न पाहायला हवीत. जेव्हा टीम व स्वप्न एकत्र येतात तेव्हा मोठी कामे होतात. प्रत्येक गोष्ट स्वप्नापासून सुरु होते. स्वप्नपूर्तीसाठी काम करताना कधी अपयश येऊ शकते. पण त्यामुळे आपण छोटे ध्येय ठेवू नये. आपण नेहमी मोठी ध्येये ठेवावीत.”

“रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीटने पुढील 5 वर्षात स्वतःचे कॉम्युनिटी सेंटर- समाजोपयोगी केंद्र बांधण्याचा निर्धार केला आहे. हे मोठे ध्येय असून ते पूर्ण करण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत,” असेही ते म्हणाले.

पदग्रहणानंतर बोलताना भोसले म्हणाले की, “क्लबने मावळ तालुक्यातील महागाव ग्रुप ग्रामपंचायत पाच वर्षांकरिता दत्तक घेतली आहे. हे गाव पुण्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. तिथे शाळा सुशोभीकरण, रोजगार निर्मिती, शौचालय बांधणे व इतर उपक्रम राबवले जातील. या क्लबला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट क्लब बनवण्याचा आमचा निर्धार आहे”

माजी अध्यक्ष विनय कानेटकर व परिवाराला सर्वोत्कृष्ट रोटरी परिवार हा सन्मान देण्यात आला. अभिजित शाह यांना सर्वोत्कृष्ट रोटरिअन, माजी अध्यक्ष अनिल नेवाळे यांना सर्वाधिक देणगीदार तर सर्वात सक्रिय ऍन (रोटरी मेम्बरच्या पत्नी) सुवर्णा काळे व स्मिता होळ यांना हे सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.

क्लबच्या वतीने वर्षभरात 14 सेवा प्रकल्प राबवण्यात आले व त्याचा लाभ 9100 लाभार्थींना झाला. क्लबने 6,500 अमेरिकन डॉलर्सची देणगी रोटरी इंटरनॅशनलला दिली तसेच 1300 अमेरिकन डॉलर्सची देणगी पोलिओ निर्मूलन कार्यासाठी दिली. पूर्ण वर्षभरात क्लबने 11.90 लाख रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत.