येत्या दहा दिवसांत काँग्रेसला राहुल गांधी यांच्या ऐवजी नवा अध्यक्ष मिळणार ?

0
597

नवी दिल्ली,  दि. २६ (पीसीबी) – पुढील दहा दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाला राहुल गांधी यांच्या ऐवजी नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. ते आपला निर्णय मागे घेण्याची   शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय पक्षाचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नको, गांधी घराण्याबाहेरचे नाव सुचवा, असेही  त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार?  याची चर्चा सुरु झाली आहे.

शनिवारी झालेल्या काँग्रेस  कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवावरुन जोरदार मंथन झाले.  त्यात राहुल गांधी यांनी दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव  कार्यकारिणीने  फेटाळून लावला होता. राहुल यांना पक्षाची पुर्नरचना करण्याचे सर्वाधिकारही देण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाची नवी रचना कशी असणार?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकाच वेळी काँग्रेसचे ४ कार्यकारी अध्यक्ष नेमले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.  परंतु या चार कार्यकारी अध्यक्षांमध्येही प्रियंका गांधी यांचा समावेश नसणार हे निश्चित आहे. कारण घराणेशाहीच्या आरोपातून काँग्रेसला मुक्त करण्यासाठीच राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत.  त्यामुळे २०१९ च्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.