लालूप्रसादांनी घेतला पराभवाचा धसका; एकवेळचे जेवण सोडले

0
413

पाटणा, दि. २६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाचा  बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यांनी  एकवेळचे जेवण करणे सोडून दिल्याने त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे, असे रांचीतील आरआयएमएस रुग्णालयाच्या  डॉक्टरांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यांच्या  राष्ट्रीय जनता दलाला भोपळाही फोडता आलेला नाही. निकालानंतर लालूप्रसाद यांचा दिनक्रम पूर्णपणे बदलला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते सकाळी पोटभर नाश्ताही करत नाहीत. दुपारी जेवतही नाहीत. सकाळी नाश्ता केल्यानंतर थेट रात्रीच जेवतात. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देणे कठीण झाले आहे, असे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी सांगितले.

लालूप्रसाद यांची आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारी जेवण न करणे, आरोग्यासाठी धोक्याचे आहे.  वेळेवर जेवण केले नाही, तर त्यांना औषधं आणि इन्सुलिन देणे कठीण होणार आहे.  त्यांनी जेवण न केल्यास   ब्लड आणि शूगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.