शरद पवार यांना शिक्षा देण्याची वेळ – नरेंद्र मोदी

0
69

एक मोठा नेता 15 वर्षांपूर्वी माढ्यात निवडणूक लढविण्यासाठी आला होता. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी पोचविण्याची शपथ घेतली होती. त्यांनी या ठिकाणी पाणी पोचवले नाही, हे तुमच्या लक्षात असेलच. त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

भारतीय जनता पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची माळशिरस येथे सभा होत आहे. त्या सभेत सुरुवातीलाच मोदी यांनी पाण्यावरून शरद पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्राची जनता आशीर्वाद देताना कोणतीही कसर ठेवत नाही. जे लोक वचन पूर्ण करत नाहीत, त्यांचा हिशेबही महाराष्ट्रातील जनता बरोबर करते. त्यांना बरोबर लक्षात ठेवते. त्या मोठ्या नेत्याने माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवले नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा मराठीतून भाषणाची सुरुवात केली. विकासित भारतासाठी मी मत मागायला आलो आहे. मी वेळेत येतो, दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत, त्यांची मी माफी मागतो. पण, मला पुढील सभेसाठी जायचे असल्याने मी वेळेत आलो आहे, मला माफ करा, या शब्दांत नरेंद्र मोदींनी उशिरा येणाऱ्या लोकांची माफी मागितली.

मोदी म्हणाले, माढ्यातील माता बहिणी मला आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. काँग्रेसचे ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत राज्य होते. पण, ते 60 वर्षांत जे केले नाही, ते आपल्या सेवकाने (मोदी) करून दाखवले. काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून फक्त गरिबी हटविण्याचे नारा देत होते. मात्र, ती हटविण्यासाठी काही करत नव्हते. आम्ही गेली दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. या 25 कोटी गरिबीतून बाहेर आलेल्या लोकांचे पुण्य मतदारांना जाते. त्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशात मजबूत सरकार असते, तेव्हा वर्तमान काळाबरोबरच भविष्याकडे लक्ष असते. त्यामुळे रेल्वे, महामार्ग, इतर पायाभूत सुविधांसाठी काम करण्यात येत आहे.

मराठवाडा, विदर्भाला पाण्यासाठी काँग्रेसने त्रासवले आहे. काँग्रेसला जनतेने 60 वर्षे राज्य करण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोणी पोचवू शकली नाही. जवळपास 100 योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील 26 योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. सर्वांना पणी देण्याची माझी योजना आहे. सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकद लावली आहे. आतापर्यंत 36 योजना पूर्ण झाल्या आहेत. नीळवंडे धरण आम्ही पूर्ण केले आहे, गोसे खुर्दसाठी काम चालू आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.