मी ते वाक्य बोललोच नाही , मी असं कीर्तन केलंच नाही – इंदोरीकर महाराज

0
655

अहमदनगर,दि.२०(पीसीबी) – “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्यानं मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही.” असं प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत.

इंदोरीकर महाराजांनी शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (१९ फेब्रुवारी) पीसीपीएनडीटी कायद्यानुसार मिळालेल्या नोटीसला उत्तर दिलं. अखेर इंदोरीकरांनी आरोग्य विभागाला दिलेलं उत्तर समोर आलं आहे. यात इंदोरीकर महाराजांनी मी असं वाक्य बोललोच नाही आणि मी असं कीर्तन केलंच नाही, असा दावा केला आहे.विशेष म्हणजे इंदोरीकर महाराज यांनी जाहीर कीर्तनात सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी इंदोरीकर महाराज काहीही चुकीचं बोलले नसल्याचा दावाही केला.

मात्र, ज्या युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ अपलोड केला होता, त्या चॅनेलने वादानंतर संबंधित व्हिडीओ डिलीट केला आहे. त्यानंतर आता इंदोरीकर महाराज यांनी नोटीसला उत्तर देताना आपण ते वाक्यच बोललो नसल्याचा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, अहमदनगर आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांसोबतच या संबंधित वृत्तांकन करणाऱ्या वर्तमानपत्रालाही नोटीस दिली होती. यावर संबंधित वृत्तपत्राने अद्याप उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे ते काय उत्तर देतात आणि काय पुरावे देतात हेही पाहावं लागणार आहे.