मावळ मतदारसंघात तरूण, तडफदार बाबाराजे देशमुख सर्वांचे लक्ष वेधणार; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0
1283

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून बाबाराजे देशमुख या युवकाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. बाबाराजे यांची तरूणाईमध्ये चांगली क्रेझ आहे. त्यामुळे निवडणुकीत ते चांगली मते घेतील, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि आमदार अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीत पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यातच खरी लढाई असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील आणि तरूणाईमध्ये चांगली क्रेझ असलेले बाबाराजे देशमुख हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील आणि अपक्ष बाबाराजे देशमुख या दोघांनीही सोमवारी (दि. ८) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाबाराजे देशमुख हे मावळ तालुक्यातील आहेत. बाबाराजेंनी मराठा आरक्षण मोर्चात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर सडेतोड भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बाबाराजे यांच्याविषयी तरूणाईमध्ये आकर्षण आहे. ते निवडणुकीत कीती मते घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बाबाराजे देशमुख म्हणाले, “विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचा डांगोरा पिटला जात आहे. हे संसदरत्न खासदार पाच वर्षे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाठपुरावा केल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात गड-किल्ल्यांनीच यांचा पाठपुरावा केला आहे. सर्व राजकारण्यांनी शेतकरी देशोधडीला लावला आहे. आरक्षणाचे सर्व मुद्दे प्रलंबित ठेवले आहेत. स्थानिक युवकांचे रोजगार हिरावले आहेत. शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ बैलगाड्यांच्या शर्यती बंद केल्या. हे सामान्यांचे सर्व हक्क पुन्हा मिळवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. मावळ लोकसभेचे मैदान आपणच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”