मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी अन् डॉ. प्रकाश आंबेडकर यांची पवारांच्या कुटुंबशाहीवर टिका

0
6016

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – महाराष्ट्रात मराठा समाजाची सत्ता नाही, तर काही मराठा कुटुंबांची सत्ता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात कुणाचे नाव चर्चेत आहे. मला नातेगोते सांगण्याची गरज नाही. नात्यागोत्यांची सत्ता गाडल्याशिवाय राहणार नाही ही खूणगाठ वंचितांनी बांधली पाहिजे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार अजितदादा पवार यांच्या कुटुंबशाहीवर सोमवारी (दि. २८) टिका केली.

पिंपरीतील एच. ए. मैदानावर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. या सभेत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपसोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, माजी आमदार लक्ष्मण माने, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, एमआयएमचे शहराध्यक्ष अकिल मुजावर, ओबीसी महासंघाचे प्रताप गुरव, माळी समाजाचे नेते सचिन माळी, धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते.

डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महाराष्ट्रात काही मराठा कुटुंबांचीच सत्ता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी कोणाचे नाव चर्चेत आहे, हे मला सांगण्याची गरज नाही. हे नाव कोणाच्या नात्यागोत्यातील आहे, हेही सांगण्याची आवश्यकता नाही. ही नात्यागोत्यांची सत्ता गाडल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका वंचितांनी घेतली पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुटुंबशाही चालणार नाही. लोकशाहीत कर्तबगार माणूस निवडून गेला पाहिजे. कर्तबगार माणूस निवडणुकीला उभा राहिला तरच याठिकाणची परिस्थिती बदलते. नात्यागोत्यातून निवडून आलेले मंत्री परदेशात जातात काही तरी बघतात आणि या शहरात बीआरटी सुरूवात करतात. ज्यांनी बीआरटी सुरूवात केली, त्यांनी रस्त्याच्या मधोमध सुरूवात केली. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी रस्ता कसा ओलांडायचा याचा विचार होत नाही. त्यामुळे बीआरटी ही संकल्पना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अशा प्रकारचे बिनडोक नियोजन आपणा सर्वांना मातीत घालत असल्याची टिका त्यांनी केली.”