आरक्षण म्हणजे खिरापत झाली आहे, आरक्षणाने विद्रोह थांबणार नाही – डॉ. प्रकाश आंबेडकर

0
1700

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – आरक्षण म्हणजे खिरापत झाली आहे. आरक्षणाने विद्रोह थांबणार नाही. या देशात मानवतेचा आणि करूणेचा बळी घेतला जात आहे. पुन्हा मानवतावादी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. द्वेषाचे आणि मतभेदाचे राजकारण संपले पाहिजे. त्यासाठी वंचितांनी वंचिताला मतदान करून आता सत्ताधारी झाले पाहिजे. देशाची सत्ता बहुसंख्यांकांच्या हातात गेली पाहिजे. या देशाचे मालक आम्ही आहोत, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (दि. २८) केले.

पिंपरीतील एच. ए. मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता.

डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आपण ७० वर्षे प्रतिष्ठा, अधिकार, आमदारकी, खासदारकी आणि विकासापासून वंचित राहिलो. आपण इतरांच्या खांद्यावर माना ठेवल्या. त्या मानावर सुराच चालवल्या गेल्या. आता आपण आपली मान इतर कोणाच्याही खांद्यावर ठेवण्याची गरज नाही. आता आम्ही आमची मान आमच्या खांद्यावरच ठेवणार आहे. आमचा विकास आम्हीच करणार आहोत. शोषणाचा अंत कधी ना कधी होतो. त्याची आता सुरूवात झाली आहे. राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता एकवटल्यास आपल्यासारख्या वंचितांचे आवाज बंद केले जातील. तसे होऊ नये यासाठी आर्थिक सत्ता ही शासनाच्याच हाती असली पाहिजे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष बिल्डरांचे आणि धनवानांचे होते. भाजप आणि शिवसेनावाले आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच वाटेने चालली आहेत. ती चीड लोकांमध्ये निर्माण झाली आहे. तो संपवण्यासाठी आरक्षणाचा डाव खेळला जात आहे. आरक्षण देणे म्हणजे खिराफत वाटण्यासारखे झाले आहे. आरक्षणाने विद्रोह थांबणार नाही. सरकारने तयार केलेल्या व्यवस्थेत मानवतावाद संपला आहे. या देशात मानवतेचा आणि करूणेचा बळी दिला जात आहे. ही व्यवस्था उलथवून मानवतावादी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी वंचितांनी द्वेषाचे आणि मतभेदाचे राजकारण संपवले पाहिजे. त्यासाठी एकमेकाला मतदान केले पाहिजे. ही सत्ता बहुसंख्यांकांच्या हाती आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.