मावळच्या पराभवाची जबाबदारी माझी – अजित पवार

0
635

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात पुत्र पार्थ पवार याचा दारूण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. त्या पराभवाची जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  

लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरून आता पुढच्या तयारीला लागणे गरजेचे आहे.  राज्यासमोर दुष्काळाचा मोठा प्रश्न आहे. त्याचा मुकाबला कसा करायचा, याबाबत आम्ही  चर्चा केली, असे आज (मंगळवार) मुंबईत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी  सांगितले.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात पार्थ पवार यांना उतरून राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत बारणे यांनी पार्थ पवार यांचा दोन लाखांच्या अधिक मताधिक्याने दारूण पराभव केला.

पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र,  आता अजित पवार यांनी  प्रतिक्रिया देऊन पराभवाची जबाबदारी आपली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने मुंबई येथील बैठकीत लोकसभेतील पराभवावर चर्चा केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.