माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात, उपचारासाठी नागपूरला हलविले….

0
261

अमरावती, दि.११ (पीसीबी) – चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आज सकाळी ६ ते ६.३० वाजताच्या दरम्यान अपघात झाला आहे. एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्यासाठी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना उडवले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याने अमरावती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. येथून १० ते १५ मिनीटांत त्यांना नागपूरला हलविण्यात येणार आहे.

अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील आराधना चौकात हा अपघात आज सकाळी घडला. अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. बच्चू कडू हे एका कार्यक्रमाला जाण्याकरिता अमरावतीत आले होते. कठोरा नाक्यावरील आराधना चौकात एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बसण्याकरिता ते जात होते. दरम्यान भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावरील दुभाजकावर पडले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच पायाला मार लागला आहे. त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच प्रहारचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. बच्चू कडू यांच्यावर स्थानिक डॉक्टर उपचार करीत आहे. पण त्यामुळे त्यांना पाहिजे तसा आराम झालेला नाही. त्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून चार टाके लागले आहेत आणि पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती रुग्णालयात उपस्थित लोकांनी दिली.