काँग्रेसचे नेते, इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे निधन

0
196

नाशिक, दि. ११ (पीसीबी) : नाशिकच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात एक दुःखद घटना घडली असून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निष्ठवान कार्यकर्ते माजी आमदार आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे काल उशिरा निधन झाले. ते 75 वर्षाचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. तरीदेखील नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने त्यांनी जाण्यास टाळले. दरम्यान काल त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. युवक काँग्रेस पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची गोल्फ क्लब मैदानावर छाजेड यांच्या पुढाकारातून सभा झाली होती.

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. नाशिकचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रितीश, हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. दरम्यान आज नाशिकच्या काँग्रेस भवन त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहेत

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने नाशिकच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून इंटक संघटनेचा आवाज हरपला आहे. अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाशी अतिशय निष्ठावान असलेल्या छाजेड यांना स्व.विलासराव देशमुख यांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. या काळात त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवर अनेक संघटनात्मक पदे त्यांनी भूषविली. इंटक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने इटक संघटना कायमची पोरकी झाली असून लढवय्या कामगार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.