महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3 जानेवारी रोजी प्रबोधन पर्व.

0
343

पिंपरी,दि. ३१ (पीसीबी) – महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3 जानेवारी 2023 रोजी पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे “महिला शिक्षण दिन” साजरा करण्याच्या अनुषंगाने  विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिह यांच्या हस्ते 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे.   तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता महापालिकेतील तळमजल्यावर चित्रकार विजय शिंदे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते होणार आहे.  

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित विचार प्रबोधन पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी महिला बचत गट व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.  सकाळी साडेअकरा वाजता “मी तुमची सावित्रीबाई फुले” हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री नाट्यप्रयोग सुप्रसिध्द कलाकार मेघना झुझम या सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात साडेबारा वाजता संगीत फ्युजन अविष्कारांसह “सावित्रीच्या ज्योती” हा सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिध्द कलाकार रितेश नगराळे सादर करणार आहेत.  दुपारी दोन वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अकोला येथील अनंत राऊत,  इचलकरंजी येथील रोहित शिंगे, सोयगांव येथील डॉ.स्वप्निल चौधरी, पिंपरी चिंचवड येथील अनिल दिक्षीत, देहू येथील मेहमुदा शेख  हे कवी सहभागी होणार आहेत.  

दुपारी साडेचार वाजता  “सावित्रीच्या लेकी” या विषयावर आधारीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्त्या अॅड. मनिषा महाजन, पत्रकार अश्विनी सातव डोके,   अॅड. निशा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी सहा वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत “वंदन ज्ञानज्योतीला” या संगीतमय कार्यक्रमाद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वाची सांगता होणार असून यामध्ये सुप्रसिध्द गायक सुधाकर वारभुवन, मारुती जकाते, सागर येल्लाळे, अनिरुद्ध सूर्यवंशी हे कलाकार सहभागी होणार आहेत.  नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.