भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांमध्ये राजकीय युद्ध; कोटींच्या कोटी उड्डाण ठरतोय कळीचा मुद्दा

0
4013

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – राजकीयदृष्ट्या पुढारलेला पण विकासाच्या बाबतीत मागासच म्हणावे, अशी स्थिती असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांमध्ये सोमवारी (दि. ४) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय यु्द्ध रंगले. त्यासाठी चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाचा मुद्दा कळीचा ठरला. महापौर राहुल जाधव आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने हे दोघेही भोसरी विधानसभा मतदारसंघातील. त्यांच्यात प्रत्येक सर्वसाधारण सभांमध्ये खडाजंगी होते. आता या खडाजंगीत माजी महापौर नितीन काळजे यांची भर पडली आहे. चऱ्होली भागातील रस्ते कामांनी वाढीव खर्चाच्या नावाखाली घेतलेली कोटींच्या कोटी उड्डाणाचा मुद्दा वारंवार उपस्थित होऊ लागला आहे. परिणामी दुखऱ्या नसेला लागलेल्या धक्क्यामुळे काळजे यांनाही सभागृहात रंगणाऱ्या राजकीय युद्धात उडी घ्यावी लागली. त्यांनी नुसती उडी घेतली नाही, तर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भ्रष्टाचाराविरोधात खुशाल कोर्टात जावे, असे सभागृहात ठणकावून सांगितले. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील या नगरसेवकांमध्ये राजकीय युद्धाचे उत्तरायण सुरू होण्याच्या बेतात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी. यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाने विकासाच्या बाबतीत बुलेट ट्रेनची गती पकडली आहे. पिंपरी मतदारसंघ हा शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने या मतदारसंघातही विकास पाहायला मिळतो. चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत भोसरी विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत निश्चितच मागास आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आणि गावकीभावकीच्या राजकारणात आणली जाणारी आडकाठी हे त्यामागचे खरे कारण आहे. विकासात आडकाठी कशी आणता येईल, याचेच डावपेच जास्त खेळले गेल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला हे वास्तव आहे. त्याचा फटका मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागतोय, हेही तितकेच सत्य आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात विकासाची कोणतीही कामे असोत, त्याला इतकी संथगती प्राप्त होते की १०० रुपयांत होणारे काम १ कोटीपर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. चिखलीतील स्वस्त घरकुल प्रकल्प असो की गवळीमाथा येथे उभारण्यात येणारी बालनगरी. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मतदारसंघातील कोणताही प्रकल्प घ्या दहा-दहा वर्षे झाली तरी पूर्ण होत नाहीत. आता मोशी कचरा डेपोतील नियोजित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि मोशी व चऱ्होलीतील नियोजित प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रकल्पाची तीच अवस्था होईल, हे कोणा ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही. मतदारसंघातील बहुतांश लोकप्रतिनिधींच्या नसानसात “हम करे सो कायदा” ही वृत्ती भिनलेली असल्याने त्याचा थेट परिणाम विकासाच्या गतीवर होत आहे. शहराच्या अन्य भागात मोठ मोठे प्रकल्प उभारलेले असताना भोसरी मतदारसंघ मात्र विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे राहिल्याचे शल्य ना लोकप्रतिनिधींना वाटते ना नेतृत्वाला, अशी स्थिती आहे.

अशा परिस्थितीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांमध्ये रस्ते कामांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता चिखलीतील संतपीठाच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, ही विकासकामे करत असताना कोट्यवधी रुपयांच्या वाढीव रक्कमेमुळे आणि संतपीठात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांमध्ये राजकीय युद्ध सुरू झाले आहे. महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने हे दोघेही भोसरी विधानसभा मतदारसंघातील आणि चिखलीचे आहेत. या दोघांमध्ये महापालिकेत कायम शाब्दिक युद्ध रंगलेले असते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाधव आणि साने यांच्यात खडाजंगी ही ठरलेली असते. अनेकदा ही दोघांमधील नुरा कुस्ती असल्याचे म्हटले जाते. साने यांनी मारल्यासारखे करायचे आणि जाधव यांनी रडल्यासारखे करायचे, हे या दोघांत ठरले असल्याची चर्चाही महापालिकेत होते. पण वास्तव काय आहे, हे तेच सांगू शकणार आहेत.

आता महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये होणाऱ्या खडाजंगीत माजी महापौर नितीन काळजे यांनी उडी घेतली आहे. सोमवारी (दि. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेत दत्ता साने यांनी चऱ्होलीतील रस्त्यांवर होणाऱ्या वाढीव खर्चाचा मुद्दा उपस्थित केल्याने नितीन काळजे यांच्या दुखऱ्या नसेला धक्का लागला. त्यामुळे महापौर असताना कधीही न संतापलेल्या नितीन काळजे यांना सभागृहाने आवेशात बोलताना प्रथमच पाहिले. साने यांनी भ्रष्टाचाराविरोधात खुशाल कोर्टात जावे, असे काळजे यांनी ठणकावून सांगितले. सभागृहात भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांमध्येच कायम होणाऱ्या या खडाजंगीला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात उत्तरोत्तर भोसरीच्या नगरसेवकांमध्ये राजकीय युद्धाचे उत्तरायण सुरू होण्याच्या बेतात आहे. त्यातून या मतदारसंघाचा जलदगतीने विकास होतो की निव्वळ चिखलफेक होऊन “ये रे माझ्या मागल्या”सारखी अवस्था होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.