भोसरी, वाकड, चाकणमध्ये घरफोड्या; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीला

0
302
Burglar trying to pry open window on house

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भोसरी येथे गोडाऊन फोडून दीड लेखांचे बांधकाम साहित्य, रहाटणी येथे घरफोडी करून पाच लाख 89 हजारांचे दागिने आणि चिंबळी फाटा, चाकण येथे गोडाऊनमधून दोन लाख तीन हजारांचे साहित्य चोरून नेले. या तिन्ही प्रकरणी बुधवारी (दि. 19) भोसरी, वाकड आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शाहरुख कासीम शेख (वय 27, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरज रावसाहेब कांबळे (वय 28, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), संदीप धर्मा पवार (वय 19, रा. शांती नगर, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

चक्रपाणी वसाहत येथे फिर्यादी यांचे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून आरोपींनी दीड लाख रुपये किमतीच्या 150 सेंट्रिंगच्या प्लेटा चोरून नेल्या. ही घटना 8 जानेवारी दुपारी दोन ते 9 जानेवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडली.

धवल दत्तात्रय चटे (वय 35, रा. जय भवानी चौक, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. 19) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख 89 हजार रुपये किमतीचे 20.01 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने व वस्तू चोरट्याने चोरून नेल्या.

शैलेश अर्जुन अभंग (वय 43, रा. महादेव नगर, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे हरिराम पॅकेजिंग अँड पॉलिमर्स या कंपनीचे चिंबळी फाटा, कुरुळी येथे गोडाऊन आहे. 7 जानेवारी सायंकाळी सहा ते 10 जानेवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने गोडाऊनचा पत्रा उचकटून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमधून दोन लाख तीन हजार 696 रुपये किमतीचे वेगवेगळ्या टाईप व ग्रेडच्या प्लास्टिक ग्रॅन्युअल्स चोरून नेल्या.

काळेवाडी येथे घरातून पळवले एक लाखाचे दागिने

समर्थ कॉलनी, विजयनगर, काळेवाडी येथे एका घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घराच्या दुस-या मजल्यावरील खोलीत प्रवेश करून चोरट्याने कपाटातील ड्रॉवरमधून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे 21.190 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी कमल प्रमोद शिलवंत (वय 60, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.