भोसरीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात जणांची फसवणूक

0
1051

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका इसमाने सात जणांना एकूण ४३ हजार ९०० रुपयांचा गंडा घातला. ही घटना सोमवार (दि.१२ नोव्हेंबर) ते गुरुवार (दि.२० डिसेंबर) दरम्यान भोसरी नाशिक फाटा येथील ट्रगल जॉब कन्सल्टन्सी येथे घडली.

याप्रकरणी संदीप शिवाजी निकम (वय २८, रा. भागु निवास, भरतगाव वाडी, जि. सातारा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्लेसमेंटची सुवीधा पुरवणाऱ्या ट्रगल जॉब कन्सल्टन्सीचे शिवकुमार दिलीप भिंगारे आणि प्रेम सुरवसे या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवकुमार भिंगारे आणि प्रेम सुरवसे यांचे भोसरी येथे ट्रगल जॉब कन्सल्टन्सी नावाची प्लेसमेंट सुवीधा पुरवणारे कार्यालय आहे. सोमवार (दि.१२ नोव्हेंबर) ते गुरुवार (दि.२० डिसेंबर) या कालावधीत आरोपींनी फिर्यादी संदीप निकम आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सहा जणांना कामाला लावतो म्हणून एकूण ४३ हजार ९०० रुपये घेतले. मात्र अद्याप त्यापैकी कोणालाही कामाला लावले नाही आणि त्यांची आर्थीक फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपी भिंगारे आणि सुरवसे यांना अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस तपास करत आहेत.