नगर: कर्जतचा अतिक्रमण वाद पेटला; मुस्लिम संघटनांचा बंद

0
1044

अहमदनगर, दि. २१ (पीसीबी) – कर्जत येथील दावल मलिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या तौसिफ शेख उर्फ सूर्याभाई यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद आज कर्जतमध्ये उमटले आहेत. नागरिकांनी शहर बंद ठेवून निषेध मोर्चा काढला. शाळा-महाविद्यालयांसह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.

आंदोलकांचा मुख्य रोष पोलिस आणि प्रशासनाविरुद्ध आहे. त्यासोबतच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचाही आरोप केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न कर्जतमध्ये गाजत आहे. कोर्टाने अतिक्रमण पाडण्याचा आदेश दिला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त अगर अन्य कारणे सांगून कारवाई टाळली जात असल्याने शेख यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतले. त्यात गंभीर भाजल्यानंतर त्यांना पुण्याला हलविण्यात आले. रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

ही माहिती समजताच कर्जतमध्ये मुस्लिम समाजासह अन्य कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. कालच बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेख यांचा मृत्यू झाल्याने कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. सकाळी फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ते इदगाह मैदानावर एकत्र आले. तेथे सभा झाली. तौसिफ यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे आणि अतिक्रमण तात्‍काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील संबंधितांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.