भूषण गगरानी मुंबई महापालिका आयुक्तपदी

0
66

मुंबई, दि. २० (पीसीबी) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकऱ्यांपैकी एक समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्त पदी वर्णी लागली असे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी आशिष शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गगराणी यांची मुंबई महानगरालिका आयुक्तपदी वर्णी लावणे हा याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी भूषण गगराणी यांची ओळख आहे. दोन दिवसांत भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त पद स्विकारतील, असे ही मंत्रालयातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.

मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्याच्या वीस दिवसांनी 1990 बॅचचे आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांना मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव बनविले होते. मुख्यमंत्री सचिवालयामधील ही सर्वात मोठी नियुक्ती होती. महाविकास आघाड़ी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव या स्वरूपात गगराणी यांनी काम केले होते.