भारतीय गव्हात रुबेला विषाणू ? टंचाई असूनही तुर्कीने 56,877 दशलक्ष टन धान्याने भरलेले जहाज परत पाठवले

0
337

देश, दि. १ (पीसीबी)- वाढती महागाई आणि कमकुवत चलन यांच्याशी झुंजत असलेल्या तुर्कीने भारतीय गव्हाची खेप स्वीकारण्यास नकार दिला आहे. फायटोसॅनिटरी संबंधित चिंतेचा हवाला देत तुर्कीने असा निर्णय घेतला आहे. फायटोसॅनिटरी म्हणजे वनस्पतींशी संबंधित रोग. S&P ग्लोबलने यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

इस्तंबूलस्थित एका व्यापाऱ्याने सांगितले की, ‘कृषी मंत्रालयाला भारतीय गव्हाच्या मालामध्ये रुबेला विषाणू आढळून आला आहे, त्यामुळे तो नाकारण्यात आला आहे.’ आता 56,877 दशलक्ष टन गहू भरलेले एमव्ही इंस अकडेनिज जहाज तुर्कीच्या इस्केंडरुन बंदरातून निघाले आहे आणि जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांडला बंदरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

तुर्कीने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही

तुर्कस्तानच्या कृषी मंत्रालयाने अद्याप माल नाकारल्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर दिलेले नाही. तुर्कीचे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार गव्हाचा पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तुर्कीच्या या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना त्रास होऊ शकतो. कारण येत्या काही दिवसांत भारतीय गव्हाची शिपमेंट इजिप्तसह विविध देशांमध्ये जाणार आहे. भारतीय गहू नाकारल्याने इतर देशांकडून त्याच्या गुणवत्तेवरही प्रश्न निर्माण होऊ शकतात.

भारतीय फायटोसॅनिटरी उपायांची तपासणी

सुमारे दोन महिन्यांपूर्वी गुणवत्ता तपासणीनंतर इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली होती. भारतीय गव्हाचा दर्जा तपासण्यासाठी इजिप्तचे शिष्टमंडळ भारतात आले होते. शिष्टमंडळाने मध्य प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्राचा दौरा केला होता. शिष्टमंडळाने गव्हाचे नमुने तपासले होते. भारतीय फायटोसॅनिटरी उपायांची देखील तपासणी करण्यात आली.

भारतातील इजिप्तचे राजदूत वाल मोहम्मद अवद हमीद हे देखील या शिष्टमंडळासोबत होते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे, परंतु तो कमी गहू निर्यात करतो. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यातदार देश आहे. गव्हाच्या निर्यातीत युक्रेन सहाव्या क्रमांकावर आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाची उपलब्धता कमी झाली आहे.

भारतात गव्हाच्या निर्यातीवर बंदी

गव्हाच्या वाढत्या देशांतर्गत किमती रोखण्यासाठी भारताने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते. 13 मे पर्यंत लेटर ऑफ क्रेडिट (LOC) मिळालेल्या कंपन्या-फर्म्स निर्यात करू शकतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारने निर्यातीवर बंदी घातली नसती तर 2006-07 सारखी परिस्थिती उद्भवू शकली असती. त्यावेळी भारताला गहू आयात करावा लागत होता, तोही दीडपट जास्त भावाने. सरकारने थांबवले नसते तर भारतातील गव्हाच्या किमती 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेल्या असत्या, जे आता 2500 रुपयांच्या जवळ आहे.

तुर्की आता गहू कुठून आयात करणार?

तुर्कीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी रॉयटर्सला सांगितले की, कॉरिडॉरद्वारे धान्य आयात करण्यासाठी तुर्की रशिया आणि युक्रेनशी चर्चा करत आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनची काळ्या समुद्रातील बंदरे बंद आहेत.

त्यामुळे 20 दशलक्ष टनांहून अधिक धान्य तेथील सायलोमध्ये अडकले आहे. वास्तविक, गहू आयात करण्यासाठी तुर्कीची रशिया आणि युक्रेनशी चर्चा अयशस्वी झाल्यास, भारतीय गहू नाकारण्याचा निर्णय महागात पडू शकतो.