भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा; जागावाटप गुलदस्त्यात

0
503

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी अखेर एका संयुक्त पत्रकाद्वारे भाजपा-शिवसेना महायुतीची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. या पत्रकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, जागावाटपाचा फॉर्मुला अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे शिवसेना- भाजप विधानसभा निवडणूक युतीतून लढवणार असल्यावर  शिक्कामोर्तब झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणा करण्यात येत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या पत्रकामध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा तसेच महायुतीतील रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या जागांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाला पंढरपूर, अक्कलकोट आणि फलटणची जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.