भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

0
778

बीड, दि. १८ (पीसीबी) लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या संचालक पदावर नेमणूकीसाठी बनावट स्वाक्षऱ्या केल्याप्रकरणी केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची फिर्याद गणपती कांबळे यांनी  न्यायालयात  केली होती.

संगीता ठोंबरे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. सदर गैरव्यवहारात आमदार श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कांबळे यांनी केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठोंबरे अडचणीत आल्या आहोत. आधीच त्या  पक्षांतर्गत गटबाजीमुळे अस्वस्थ झाल्या आहेत. त्यातच गुन्हा दाखल झाल्याने आमदार ठोंबरे यांच्या  आणखी अडचणी वाढल्या आहेत.