बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

0
226

कुरुळी, दि. २८ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने तिघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे करण्यात आली.

उत्तरसिंग रामकुमार राठोड (वय 48, भोसे, ता. खेड), कल्याणसिंग तेजस राठोड (वय 21, रा. तळेगाव दाभाडे), विकी मुरली राजपूत (वय 25, रा. भोसे, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन लोखंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथे घाडगे यांच्या शेतात तिघेजण थांबले असून त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार नितीन लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल, एक कोयता आणि एक तलवार अशी 35 हजार 400 रुपये किमतीची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांनी वापरलेली पाच लाख रुपये किमतीची एक कार देखील जप्त करण्यात आली आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.