दि.०२ -(पीसीबी)-अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याची पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, ही पत्रिका मुस्लिम कुटुंबाची असतानाही ती पूर्णपणे मराठी भाषेत छापण्यात आली आहे. या पत्रिकेत “आमचे प्रेरणास्थान” या विभागात टिपू सुलतान यांच्यासोबत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोन ऐतिहासिक व्यक्तींचा एकत्र उल्लेख झाल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी यावर टीका केली तर काहींनी याला सामाजिक सलोख्याचा संदेश मानला आहे.
दरम्यान, संबंधित कुटुंबाने या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “महाराष्ट्रात सध्या जात-पात आणि धर्माच्या आधारावर विभाजन करणारे राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समाजात हिंदू-मुस्लिम एकतेचा सकारात्मक संदेश देण्यासाठी आम्ही ही पत्रिका छापली आहे.” कुटुंबीयांनी पुढे स्पष्ट केले की, या उपक्रमामागचा उद्देश समाजात ऐक्य आणि सौहार्द वाढवणे हा आहे. “आजच्या परिस्थितीत जातीयतेचा ‘व्हायरस’ पसरवणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे,” असेही त्यांनी नमूद केले. एकूणच, या अनोख्या विवाह पत्रिकेमुळे सामाजिक माध्यमांवर चर्चेला उधाण आले असून, यामागील उद्देश आणि संदेश यावरून मतमतांतरे दिसून येत आहेत.
शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वाद उकरून काढल्याने खळबळ आहे. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी असल्याची खोटी प्रतिमा तयार करणाऱ्यांना पानसरे यांनी पुस्तकातून पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळेच
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते या अपप्रचाराला छेद देणारी ही लग्न पत्रिका खूप चर्चेत आहे.












































