बृजभूषण लैंगिक अत्याचार प्रकऱणावर चित्रा वाघ गप्प का ?

0
150

मुंबई, दि. २० (पीसीबी) – महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या अत्याचाराविरोधात राजधानी दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यासंपूर्ण प्रकरणानंतर देशातील वातावरण ढवळून निघालेले असून, अनेक राजकीय पक्षांनी या विरोधात सरकारला प्रश्न विचारत अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या प्रकरणावर भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. महिला अत्याचाराचा कोणताही विषय आला तर अक्षरशः तुटून पडणाऱ्या भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आता गप्प का, अशी विचारणा सुरू झाली आहे. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि स्वतः बृजभूषण यांच्यामध्ये आठ मिनीटे मोबाईल संभाषण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत क्रिडा मंत्रालयाने बृजभूषण सिंह यांना अल्टीमेटम देत संपूर्ण घटनेवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, देशातील महिलांविरोधातील या प्रकरणात अनेक राजकीय पक्षांनी उडी घेत बृजभूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून या प्रकरणात मनसेनेदेखील उडी घेतली आहे.
दरम्यान, महिलांवरली अत्याचारांच्या घटनांवर दरवेळी महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. मात्र, देशाचं नाव उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचारावर अद्यापपर्यंत चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. चित्रा वाघ यांच्या याभूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून, बृजभूषण सिंह भाजप खासदार असल्याने चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर दिल्लीत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू असतानाच आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बृजभूषण हा गुंड प्रवृत्तीचा आहे. ज्या महिला कुस्तीपट्टूंनी आरोप केले, त्यांच्यापैकी एक साक्षी मलिक आहे.