बँक लुटणा-या मुलचंदानीसोबतच्या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त उपस्थिती लावणार?

0
523

माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा सवाल

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांनी सेवा विकास बँक लुटून खाल्ली आहे. त्यापोटी 429.57 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत मुलचंदानी यांनी नगरसेवक संदीप वाघेरे यांना पुढे करून आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हजेरी लावणे म्हणजे एकप्रकारे गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासारखे आहे. आरोपीच्या मांडीला मांडी लावून पोलीस आयुक्त कसे? आणि का बसणार आहेत? याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी केली आहे.

आसवानी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाची धुरा सांभाळणा-या आणि त्यांच्या देखरेखीखाली सेवा विकास बँकच्या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच त्याच विभागाच्या प्रमुखाने मुख्य आरोपीने इतरांकरवी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे आक्षेपार्ह आहे. अद्यापपर्यंत सेवा विकास बँक घोटाळ्याप्रकरणी चार्टशीट कोर्टात सादर करण्यात आलेले नाही. एखादा गुन्हा तपासावर असताना त्याच गुन्ह्यातील आरोपीच्या मांडीला मांडी लावून पोलीस आयुक्त कसे आणि का बसणार आहेत याचा खुलासा आयुक्तांनी करावा.

पोलीस आयुक्तांसह महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते रावण दहन करणार असल्याचे सांगितले जात आहे. वास्तवात जो भ्रष्टाचाररूपी रावण आहे. त्याच्याच कार्यक्रमाला सनदी अधिका-यांची उपस्थिती सर्वसामान्यांवर दबाव टाकणारी आहे. पुण्याचे खासदार गिरीष बापट, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या महिला आमदार उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, माजी महापौर उषा ढोरे, आझमभाई पानसरे आदीसह अजित गव्हाणे, राहुल कलाटे, नवनाथ जगताप, सचिन चिखले, संतोष कुदळे या नगरसदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, या सर्वांनी अशा गुन्हेगाराच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे की नाही? हा विचार करण्याची गरज आहे.

स्थानिक माजी नगरसेवक संदीप वाघेरे गेल्या पंधरा वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मात्र, यंदा त्यांना हा कार्यक्रम बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अमर मुलचंदानी यांनी आयोजित करण्यास भाग पाडले असून, विशेष सहकार्य म्हणून स्वतःचे नाव छापण्यास सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्याचे भासवून, पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र क्रिडांगणावर रावण दहनाचा कार्यक्रम मुलचंदानी यांनीच आयोजित केला असल्याचे न समजण्याएवढी जनता वेडी नाही. कोट्यवधींचा घोटाळा केल्यानंतर राजकीय व्यासपीठ वापरून आपली कलंकीत प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न मुलचंदानी यांच्याकडून केला जात असून, पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नये? अशी विनंती आसवानी यांनी केली आहे.