पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

0
363

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : वस्तू आणि सेवा परिषदेची (जीएसटी कौन्सिल) बैठक येत्या शुक्रवारी लखनऊमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत परिषदेकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे . इंधनांचा जीएसटी कर प्रणालीत समावेश झाल्यास पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारचा ३२ टक्के आणि राज्य सरकारचा व्हॅट २३.०७ टक्के कर आकारला जातो. प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा भाव सरासरी १०९.१९ रुपये आणि डिझेलचा भाव ८८.६२ रुपये इतका आहे. इंधन जीएसटीच्या कक्षेत आल्यास केंद्र आणि राज्य सरकारची दुहेरी कर पद्धती संपुष्टात येईल. त्याऐवजी एकच जीएसटी कर लागू होईल. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. जीएसटीमध्ये समावेश झाल्यास पेट्रोलचा भाव ७५ रुपये प्रती लीटर आणि डिझेलचा भाव ६८ रुपये प्रती लीटर इतका खाली येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जीएसटी परिषदेत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याबाबत प्रस्तावावर चर्चा झाली होती. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर १७ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने चर्चा केली होती. सध्या पेट्रोलचा भाव १०१.१९ रुपये प्रती लीटर आहे. त्यात केंद्र सरकारचे शुल्क ३२ टक्के आणि राज्य सरकारचा व्हॅट २३.०७ टक्के इतका आहे. डिझेलवर केंद्रीय शुल्क ३५ टक्के आणि राज्य सरकारचा कर १४ टक्के इतका आकारला जातो.

केंद्र सरकारच्या कर महसुलात इंधनातून मिळणाऱ्या कराचा मोठा वाटा आहे. सरकारला २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांतून ३,७१,७२६ कोटींचा कर महसूल मिळाला होता. राज्य सरकारांना व्हॅटमधून २,०२,९३७ कोटी मिळाले होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास सरकारला मोठ्या कर महसुलावर पाणी सोडावे लागेल.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी २८ जून २०२२ कंपन्यांनी इंधन दर ‘जैसे थे’च ठेवले. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये इतका आहे. कोलकात्यात १०६.०३ रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये पेट्रोलचा भाव १०१.९४ रुपये इतका असून चंदीगडमध्ये ९६.२० रुपये इतका आहे.
|

मुंबईत एक लीटर डिझेलचा ९७.२८ रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर डिझेलचा भाव ९२.२४ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.७६ रुपये इतका आहे. बंगळुरुमध्ये ८७.८९ रुपये इतका असून चंदीगडमध्ये डिझेलचा भाव ८४.२६ रुपये इतका आहे.