पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी अधिका-यांची नियुक्ती

0
195

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी कक्ष प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता थॅामस न-होना यांची तसेच नोडल ऑफिसर म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत राज्यात पावसाळा असतो. या कालावधीत मान्सून आगमनामुळे राज्यात पाउस पडतो. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढते. अशावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता असते. याकाळात पूर परिस्थितीचे पूर्व नियोजन करण्याचे आणि पूर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याचे कामकाज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पूर नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला असून याद्वारे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी कक्ष प्रमुख म्हणून अणु विद्युत व दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॅामस न-होना यांची तसेच नोडल ऑफिसर म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी पुढील चार महिन्यांकरिता महापालिकेच्या वायरलेस ऑपरेटर पदावरील कर्मचा-यांच्या तीन शिफ्टमध्ये नेमणुका करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहे. तथापि, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र पूर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.