पुण्यात शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे विद्यार्थ्याला झाला पॅरेलीसीस

1821

पुणे, दि. १२ (पीसीबी) – दिवाळीला दिलेला प्रोजेक्ट पूर्ण केला नाही म्हणून एसएसपीएमएस या सैनिकी शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याला शिक्षिकाने अमानुष मारहाण केली. या मारहाणीनंतर या विद्यार्थ्याला पॅरेलीसीस झाला असून त्याचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची शक्‍यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीची सुट्टी सुरु होण्यापूर्वी शाळेतील शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण झाला आहे की नाही, हे तपासले जाते. त्यात चित्रकला शिक्षक संदिप गाडे यांनी संबंधित विद्यार्थ्याचा गृहपाठ अपूर्ण असल्यामुळे त्याला जबर मारहाण केली. बेंचवर हात ठेवून जोराने मारले. एवढेच नाही, तर बोटाच्या हाडांनी डोक्‍यावर मारले, पोटालाही चिमटे काढले, तसेच त्याच्या पायाच्या शिरा देखील दाबल्या. शनिवारी ३ नोव्हेंबरला विद्यार्थ्याचे पालक दिवाळीसाठी त्याला घ्यायला शाळेत आले. त्यावेळीही त्याला हसताना, बोलताना त्रास होत असल्याचे जाणवले. परंतु त्यानंतर दोन-तीन दिवसांनी संबंधित विद्यार्थ्यांचा एक डोळा झोपेतही उघडा राहत असल्याचे आणि त्याला हसताना, बोलताना प्रचंड त्रास होत असल्याचे जाणवले. त्यामुळे बारामती येथील रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांकडे पालकांनी त्याला नेले. त्यावेळी विद्यार्थ्याला पॅरेलीसीस झाला असून त्याचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची शक्‍यता डॉक्टरांनी वर्तविली. याबाबत आज घडलेला प्रकार विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी एसएसपीएमएस शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांना सांगितला. त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश देऊन शिक्षक संदिप गाडे याला निलंबित केले आहे. तसेच संबंधीत प्रकाराबाबत पोलीसात तक्रार देखील करणार असल्याचे सांगितले आहे.