संतप्त मतदारांनी नवनीत राणा यांना आडवून विचारला जाब

0
73

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आज (२४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तसेच दि. २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपापल्या मदारसंघातील जन्मोत्सव सोहळ्यांना हजेरी लावली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे हनुमान चालीसाच्या आंदोलनातून करोना काळात चांगलेच चर्चेत आले होते. यानिमित्त नवनीत राणा यांनीही आपल्या मतदारसंघातील हनुमान मंदिरांना भेटी दिल्या. मात्र अंजनगाव तालुक्यातील चौसाळा गावात हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना मतदारांच्या संतापाचा सामना करावा लागला.

नेमकं काय घडलं?
खासदार नवनीत राणा चौसाळा गावातील मंदिरात दर्शन घेऊन परत जात असताना काही तरूण शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेले एक फलक पाहण्यासाठी आमच्याबरोबर चला, अशी मागणी या लोकांनी केली. मात्र रात्रीचे १२ वाजले असून मला अजूनही चार ते पाच गावांमध्ये जायचे असल्याचे सांगून नवनीत राणा यांनी त्या लोकांबरोबर जाण्यास नकार दिला. तसेच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या इथेच सांगा, असेही सांगितले. मात्र शेतकरी त्यांना फलक बघायला चलाच, या हट्टावर पेटले होते.

नवनीत राणा या फलक पाहण्यासाठी येत नाहीत, हे पाहून शेतकऱ्यांनी नवनीत राणा यांना त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली. मोदींची हवा नसून या फुग्यात राहू नका, असे नवनीत राणा एकदम बरोबर बोलल्याचे शेतकरी म्हणाले. यावर नवनीत राणा चांगल्याच संतापल्या त्या म्हणाले, मोदींची हवा आहेच. तुम्हाला या विषयावर वाद घालायचा असल्यास मी तयार आहे, हे सांगून नवनीत राणा मंदिर परिसरातून बाहेर जाऊ लागल्या.

नवनीत राणा माघारी फिरत असल्याचे पाहून गावातील शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. “तुम्हाला मतदान करून आम्ही चूक केली. तुम्ही आमच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत. यावेळी मोदींना घरी पाठविणार, असे म्हणत गावकऱ्यांनी जय भवानी, जय शिवाजी”, अशा घोषणा सुरू केल्या. या गदारोळात नवनीत राणा आपल्या गाडीत बसून थोड्या पुढे गेल्या. मात्र घोषणाबाजी वाढू लागल्यानंतर त्या गाडी थांबवून खाली उतरल्या आणि घोषणाबाजी करणाऱ्या गर्दीत घुसून जाब विचारू लागल्या. मात्र नवनीत राणा यांचे सुरक्षा रक्षक आणि स्वीय सहाय्यकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना बाजूला केले आणि चिडलेल्या शेतकऱ्यांशी स्वतः चर्चा केली.