पुण्यात पुढील ७२ तासांत अतिवृष्टी; वेधशाळेचा अंदाज

0
912

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पुणे शहरासह परिसरात पुढील ७२ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने आज (मंगळवार) वर्तवली आहे. त्यामुळे ९ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, शहरात ११ ऑगस्टपर्यंत कमी- अधिक प्रमाणात पाऊस पडेल. गेल्या चोवीस तासांमध्ये शहरात ४१ मि. मी. पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत ७०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मावळ, मुळशी तालुक्यांमधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या सर्व पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केल्यानंतरच हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.