पुणे, देहूरोड, खडकीसह ५७ कॅन्टोमेंट बोर्डाच्या जाहीर केलेल्या निवडणुका रद्द

0
241

पुणे, दि. १८ (पीसीबी) : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५७ बोर्डांच्या निवडणुका जााहीर झाल्या होत्या, संरक्षण मंत्रालयाने आज त्या रद्द केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या राजपत्रानुसार आजपासून १७ मार्च पासून निवडणुकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम ४१ च्या आधारे ही ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत १८ फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती.

देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव राकेश मित्तल यांनी यासंदर्भात अधिसूचना काढली होती. या अधिसुचनेनुसार देशभरातील ६२ पैकी ५७ कँटोन्मेंटच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये छावण्यांमध्ये पुणे, खडकी, नगर, औरंगाबाद, नाशिकमधील देवळाली आणि नागपूरमधील कामठी या राज्यातील अशा एकूण सहा कँटोन्मेंट बोर्डांचीदेखील निवडणूका पार पडणार होत्या. मात्र आता या निवडणुका रद्द करण्यात आले आहेत.