पिंपळेसौदागरची तहान भागणार; पाण्याची नवीन टाकी उभारण्याच्या कामाचे आमदार जगतापांच्या हस्ते मंगळवारी भूमीपूजन

0
594

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांच्या पाठपुराव्यानंतर पिंपळेसौदागर येथे पाण्याची टाकी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुणाल आयकॉन रोडवरील आयसीआयसीआय बँकेसमोरील नियोजित उद्यानात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या कामाचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २२) भूमीपूजन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपळेसौदागरमध्ये पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळे जवळच असलेल्या पिंपळेसौदागर परिसरात गेल्या पाच-सात वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी देताना महापालिका प्रशासनाची तारांबळ उडत आहे. पिंपळेसौदागर परिसराला पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या भागात सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गेल्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. नियोजन करूनही नागरिकांना पुरेशा दाबाने आणि समप्रमाणात पाणी पुरवणे शक्य होत नसल्याने स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी पिंपळेसौदागरसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. तसेच भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनाही पिंपळेसौदागरच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, याची माहिती त्यांनी दिली होती. त्याची दखल घेत आमदार जगताप यांनीही पिंपळेसौदागरमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत पिंपळेसौदागरमधील कुणाल आयकॉन रोडवरील आयसीआयसीआय बँकेसमोरील नियोजित उद्यानात पाण्याची टाकी उभारण्याचे प्रस्तावित केले होते. नगरसेविका निर्मला कुटे या २०१७-१८ या आर्थिक वर्षात स्थायी समिती सदस्य असताना पिंपळेसौदागरमधील प्रस्तावित पाण्याच्या टाकीसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद आणि त्याला मंजुरीही घेतली होती. आता सर्व प्रशासकीय काम पूर्ण झाल्याने पिंपळेसौदारमध्ये पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात केली जाणार आहे. या कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मंगळवारी भूमीपूजन होणार आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याची टाकीमुळे पिंपळेसौदागरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी व्यक्त केला.