निगडीत दोघांना अटक करुन अडीच लाखांचे मोबाईल आणि दुचाक्या केल्या जप्त

0
585

निगडी, दि. २१ (पीसीबी) – दोघा चोरट्यांना अटक करुन १६ चोरीचे मोबाईल आणि दोन दुचाक्या असा एकूण २ लाख ४७ हजारांचा ऐवज निगडी पोलीसांच्या तपास पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई निगडीतील भक्ती शक्ती चौकात करण्यात आली.

सनी गौतम घाडगे (वय २०, रा. जिजामाता चौक हरीओम कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड मुळ. रा. रायगड) आणि सोमनाथ उर्फ सोम्या साहेबराव भगत (वय १९, रा. सी पत्राशेड मनापा शाळेच्या मागे अजंठानगर, निगडी) असे चोरीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी या दोघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती कि, निगडी येथे भक्ती शक्ती चौकात बँन्डच्या गाडीजवळ दोन मुले दुचाकी घेऊन उभी आहेत आणि त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल आहेत. यावर निगडी पोलीसांच्या तपास पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १६ चोरीचे मोबाईल आणि दोन दुचाक्या असा एकूण २ लाख ४७ हजारांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन सनी आणि सोमनाथ या दोघांना अटक केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.