पिंपरी-चिंचवडवासीयांचे दुर्दैव; अज्ञानी विरोधी पक्षनेता आणि मुद्दे असूनही भरकटलेले विरोधक

1955

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (दि. १९) विरोधी पक्ष राष्ट्रवादीची राजकीय बुद्धी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, याचे दर्शन घडले. कुत्र्याची सात-आठ पिल्ले एकाच पिशवीत भरून आणत भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न निश्चितच निंदनीय आहे. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर खाऊ-पिऊ घालून पिलांना पिशवीत घातले आणि हवा खेळती ठेवण्यासाठी पिशवीला छिद्रे पाडली होती, असे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी समर्थन करणे म्हणजे बालिशपणाचा कळसच म्हणावा लागेल. एकाच पिशवीत सात-आठ पिल्ले एकमेकांच्या अंगावर टाकून पिशवीत कोंबल्यानंतर त्यांच्यासाठी कितीही हवा खेळती ठेवली, तरी ती गुदमरून मरतील, हे लहान पोरांनाही सांगावे लागत नाही. मात्र विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना हे समजत नाही का?, हाच खरा प्रश्न आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या महिन्यात दत्ता साने यांचे अज्ञान उघड केले. त्यावरूनही राजकारण केलेल्या साने यांनी आता कुत्र्याची पिल्ले एकमेकाच्या अंगावर टाकून पिशवीत कोंबून आणत आपले ज्ञान किती अगाध आहे, हेच शहरवासीयांना दाखवून दिले आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. शहराच्या काही भागात भटक्या कुत्र्यांमुळे एकट्या-दुकट्या नागरिकाला रस्त्याने जाणे मुश्किल बनले आहे, ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी अनेकदा लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, ही सर्वांचीच भावना असणार आहे. परंतु, हा बंदोबस्त कायमचा करता येत नाही, हे वास्तव आहे. कायद्याने महापालिका प्रशासनाचे हात बांधलेले आहेत. भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिये व्यतिरिक्त प्रशासन अन्य कोणतीही इजा करू शकत नाही. भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचा किंवा त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न झाला, तरी प्रशासनाला जेलमध्ये जावे लागेल, असा कायदा आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा पर्याय नाही.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना याबाबत जाण नसल्याचे बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले आहे. अन्यथा त्यांनी कुत्र्याची लहान पिल्ले पिशवीत कैद करून सभागृहात सोडण्यासाठी आणली नसती. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कुत्र्याची लहान पिल्ले पिशवीत भरून आणणे म्हणजे क्रूरपणाच झाला. वरून त्यांना खाऊ-पिऊ घालून पिशवीत घातले आणि हवा खेळती ठेवण्यासाठी पिशवीला छिद्रे पाडली होती, असे सांगत आपल्या कृतीचे समर्थन करणे म्हणजे बालिशपणाचा कळसच म्हणावा लागेल. एकाच पिशवीत सात-आठ पिल्ले एकमेकांच्या अंगावर टाकून पिशवीत कोंबून हवा खेळती ठेवण्यासाठी पिशवीला छिद्रे पाडली, तरी ती पिल्ले आतमध्ये गुदमरून मरतील, हे अगदी लहान पोरालाही कळते. मात्र विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना हे का समजले नाही, हाच खरा मुद्दा आहे.

दत्ता साने हे विरोधी पक्षनेते झाल्यापासून सतत चर्चेत राहण्यासाठी काही ना काही तरी नाविन्यपूर्ण आंदोलने करत असतात. त्यामागे नागरिकांचे प्रश्न सुटले नाही तरी चालतील पण आपली बातमी मात्र छापून आली पाहिजे, हाच हेतू अधिक असतो. कोणत्याही मुद्द्यावर राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी ते सदैव तयार असतात. कोणत्या प्रश्नांवर काय बोलावे, याचाही ताळतंत्र त्यांच्याजवळ उरलेला नाही. ताळतंत्र सुटले की राजकीय स्टंटबाजी किती क्रूर आणि हीन पातळीवर जाऊ शकते, याचे ताजे उदाहरण म्हणून दत्ता साने यांनी कुत्र्याची पिल्ले पिशवीत भरून आणल्याच्या प्रकाराकडे पाहता येईल. सौरऊर्जा आणि कचऱ्यापासून वीजनिर्मिती यातील फरक न कळणारे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे अज्ञान आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उघड केले. त्यातून ज्ञानी होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी साने यांनी या मुद्द्याचेही राजकारण केले. आयुक्तांनी भर सभागृहात माफी मागितल्यानंतर या मुद्द्यावर पडदा पडला. हा प्रकार ताजा असतानाच दत्ता साने यांनी आता सात-आठ कुत्र्याची पिल्ले एकमेकाच्या अंगावर टाकून पिशवीत कोंबून आणत दत्ता साने यांनी पुन्हा एकदा आपले अगाध ज्ञान सिद्ध केले आहे.

दत्ता साने यांचे हे अगाध ज्ञान भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनाही बघवले नाही. त्यामुळेच त्यांनी मुक्या प्राण्यांचा छळ करणारे दत्ता साने यांच्यावर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सभागृहात केली. साने यांची जीभ घसरण्याचे प्रकार सभागृहात अनेकदा घडले आहेत. बुधवारी सुद्धा साने यांनी जातीवाचक शब्दाचा उल्लेख करून दुसऱ्यांच्या जातीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. सीमा सावळे यांना उत्तर देताना दत्ता साने यांनी आपण ९६ कुळी शेतकरी असल्याचा उल्लेख करत गाय, म्हैस, बैल, कुत्रा, घोडा, मांजर ही जनावरे आणि प्राणी पाळण्याची आमची परंपरागत संस्कृती असल्याचे सांगितले. याचाच अर्थ इतर जातीच्या शेतकऱ्यांमध्ये ही जनावरे आणि प्राणी पाळण्याची संस्कृती नाही, असे त्यांना म्हणावयाचे आहे का?, असा सवाल केला जात आहे.

दत्ता साने एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मुक्या प्राण्यांच्या छळाच्या मुद्दा झाकण्यासाठी सीमा सावळे स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना झालेला भ्रष्टाचार बाहेर काढत असल्यामुळेच मला टार्गेट केल्याचे सांगत आपल्या अकलेचे तारेही तोडले. एकंदरीत काय तर शहरात अनेक ज्वलंत मुद्दे असताना त्यावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी नको त्या मुद्द्यावरून राजकीय स्टंटबाजी करण्यातच राष्ट्रवादी धन्यता मानत आहे. दत्ता साने यांनी महापालिकेच्या अनेक प्रकल्पांच्या फायलींची झेरॉक्स काढून नेली आहे. त्यातून त्यांच्या हातात काय घबाड सापडले आहे, हे देव जाणो. परंतु, महापालिकेला अज्ञानी विरोधी पक्षनेता लाभला आहे, हे शहराचे दुर्दैव आणि सत्ताधारी भाजपचे सुदैव म्हणावे लागेल. अशा विरोधकांमुळे सत्ताधारी भाजपला काहीच चिंता नसल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादीची ही राजकीय स्टंटबाजी पक्षाच्या फायद्यासाठी कितपत उपयोगी पडेल, हा राजकीय संशोधनाचा विषय आहे.