“पाहुणे अजून घरात आहेत, त्यांचं काम चालू असून ते गेले कि मी….” : आयकर धाडीनंतर अजित पवारांच पुढचं पाऊल

0
314

पुणे, दि.०८ (पीसीबी) : पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर खात्याच्या धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयकरचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या.

मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 26 तासांपासून छापेमारी सुरु आहे. 7 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून सुरु असलेलं धाडसत्र आजही सुरु आहे. पार्थ पवार यांचे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सीईट्री नावाचे कार्यालय आहे. या इमारतीत 7 ते 8 जणांची टीम छापेमारी करत आहे. काल 12 तास आयकर विभागाने चौकशी केली होती. दरम्यान, अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आयकरच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन. जे सत्य आहे ते उघड होईल”

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर , नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.