IT अधिकाऱ्यांची कालची रात्र पार्थ पवारांच्या कार्यालयात; तब्बल २४ तासाहून जास्त वेळ आयकरची छापेमारी सुरु

0
297

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. जवळपास 28 तासांपेक्षा जास्त काळापासून हे धाडसत्र सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून, हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे. मुंबईत पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया ग्रुप, डीबी रियालिटी, या कंपन्यांच्या मालकांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी झाल्याची सूत्रांची माहिती.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.