‘कचाकच बटन दाबा’ वक्तव्य आले अजितदादांच्या अंगलट

0
82

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत. अशातच काल (बुधवारी) इंदापूर येथे एका मेळाव्यादरम्यान अजित पवार यांनी तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महायुतीकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी बारामती, शिरूर आणि पुणे मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यापूर्वी आज सकाळी अजित पवार यांनी सपत्नीक दगडूशेठ गणपतीची आरती केली आणि बाप्पाला साकड घातलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, “या लोकसभेच्या निवडणुका अतिशय चांगल्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी गणरायाने आशीर्वाद द्यावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना महाराष्ट्रातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून देऊन महाराष्ट्राचा मोठा वाटा त्यामध्ये असला पाहिजे. यासाठी आशीर्वाद मागितला.

असं असलं तरी प्रचार आणि काम करावंच लागणार आहे. जनतेचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. त्यामुळे शेवटी जनता जनार्दन सर्वकाही ठरवणार आहे. ते जो निर्णय देतील तो सर्वांना मान्य करावा लागेल.

जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पुण्यातील पुण्यातील अर्ज भरताना सोबत असणार असून यानंतर सातारा आणि सांगली आणि उद्या धाराशिवला जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

मी निधी देतो तुम्ही कचाकच बटन दाबा, या वक्तव्यावर बाबत खुलासा करताना अजित पवार म्हणाले, “तुम्ही ध् चा मा करू नका, मी हे हसत हसत गमतीने बोलत होतो, सर्व सुशिक्षित वैद्यकीय क्षेत्रातील आणि वकील मंडळी यांच्या उपस्थितीत एका सभागृहात हा मेळावा होता. ती जाहीर सभा नव्हती. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये विविध विकास काम करण्याचे आश्वासन दिले जातं मग ते प्रलोभन आहे का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

विकास कामांना निधी देण्याचे त्या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदारांचे काम असतं त्यामुळे आम्ही आधीच्या आमदार खासदारापेक्षा जास्त निधी देण्याचं जास्त विकास करण्याचे आश्वासन देतो. साधं सरळ गणित आहे. मी नेहमीच आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेत असतो मी केलेले वक्तव्य हे एका छोट्या हॉलमधील होता. समोरचे नेते राहुल गांधी यांनी खटाखट खटाखट गरिबी हटाव, असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे मी आपल्या ग्रामीण भागातील शब्द असलेला कचाकच कचाकच असा शब्द प्रयोग केला त्याचा फार कोणी बाऊ करू नये, असं अजित पवार म्हणाले.