पार्थ पवार यांच्या विजयासाठीच श्रीरंग बारणेंना शिवसेनेची उमेदवारी; ठाकरे-पवार राजकीय सेटिंगची जोरदार चर्चा

0
2729

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने ईशान्य मुंबई आणि जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार बदलले. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टिका केल्याने त्यांना ईशान्य मुंबईमध्ये उमेदवारी देण्यात आली नाही, तर जळगावमध्ये स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर करूनही शिवसेनेच्या विरोधामुळे नवीन उमेदवार देण्याची वेळ भाजपवर आली. मावळ लोकसभा मतदारसंघातही ईशान्य मुंबई आणि जळगावसारखीच परिस्थिती असताना शिवसेना “रिस्क” घेत आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना भाजपचा तीव्र विरोध असतानाही त्यांची उमेदवारी लादली गेली आहे. शिवसेनेने हे जाणूनबूजून केल्याचेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा विजय सोपा व्हावा यासाठीच विरोध असूनही बारणे यांनाच शिवसेनेने उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामागे “पवार-ठाकरे” राजकीय सेटिंग कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असूनही भाजप आणि शिवसेना गेल्या पाच वर्षांत भांडभांड भांडले. शिवसेनेने मंत्रीपदे स्वीकारूनही भाजपला विरोध कायम ठेवला. कमाईचे स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळेच शिवसेनेकडून विरोधाची धार तीव्र करण्यात आली होती. भाजपला विरोध करताना स्वतःकडे असलेल्या मंत्रीपदांच्या माध्यमातून शिवसेनेने राज्यात काय दिवे लावले, हे नागरिकांना भिंग घेऊन शोधावे लागेल. शिवसेनेच्या विरोधाला फारसे किंमत न देता भाजपने पाच वर्षांची सत्ता उपभोगली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा करून राज्यातील जनतेला अक्षरशः मुर्खात काढले.

युती झाल्यानंतर राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ मतदारसंघांपैकी शिवसेनेने २३ आणि भाजपने २५ मतदारसंघ लढवण्याचे ठरले. कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद जास्त याचा विचार न करताच हे जागा वाटप झाले. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची सर्वाधिक ताकद असताना या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार लादण्यात आला. हा मतदारसंघ भाजपने घ्यावा, अशी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची सुरूवातीपासूनची मागणी धुडकावण्यात आली. एवढे करूनही भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचे काम करण्यासाठी तयार झाले. पण शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिल्यास मताधिक्क्याने निवडून आणण्याची जबाबदारी घेण्यास भाजपचे पदाधिकारी तयार होते.

भाजपने लावून धरलेल्या या मागणीचे गांभीर्य शिवसेनेला अद्यापही कळलेले नाही. मागणी धुडकावून लावत शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. चार नगरसेवक सुद्धा निवडून आणण्याची क्षमता नसलेले आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यापासून पक्ष संघटनेची पूर्ण वाट लावलेल्या बारणे यांनाच उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार मिळाल्यामुळेच बारणे यांना उमेदवारी मिळाल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. परंतु, शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर हे देखील पाच वर्षे संसदरत्न पुरस्काराचे मानकरी होते. २०१४ मध्ये बाबर यांचे तिकीट कापून बारणे यांना देताना शिवसेनेने संसदरत्नचा निकष खुंटीला का टांगून ठेवला?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बारणे यांनाच उमेदवारी देण्यामागे फार मोठी राजकीय खेळी असल्याचे आता बोलले जात आहे. बारणे यांना पक्षातूनच विरोध होत आहे. भाजपचा तर बारणे यांना पहिल्यापासून विरोध आहे. अशा परिस्थितीत पवार कुटुंबातील पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून मावळ मतदारसंघात लढत आहेत. शिवसेनेचे ठाकरे आणि राष्ट्रवादीचे पवार यांच्यात नात्यागोत्याचे नाते आहे. पार्थ पवार यांचा विजय सोपा होण्यासाठी बारणे हेच योग्य उमेदवार ठरू शकतात. हे राजकीय समीकरण समोर ठेवूनच ठाकरे आणि पवार यांच्यात राजकीय सेटिंग झाली आणि बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सध्याची शिवसेनेच्या प्रचाराची परिस्थिती पाहिल्यास ठाकरे-पवार राजकीय सेटिंग खरे वाटावे, अशी स्थिती आहे.

मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला विरोध असतानाही शिवसेनेने तो बदलला नाही. दुसरीकडे ईशान्य मुंबई आणि जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपला आपले उमेदवार बदलावे लागले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपचे किरीट सोमय्या खासदार म्हणून निवडून आले. सोमय्या यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करून शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला केला. त्यामुळे शिवसेनेने सोमय्या यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ दिली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली होती. तेथेही शिवसेनेने वाघ यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. त्यामुळे भाजपने वाघ यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला.

पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातही ईशान्य मुंबई आणि जळगावसारखीच परिस्थिती आहे. मात्र मावळ मतदारसंघात शिवसेनेने वेगळी भूमिका आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नरमाईचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. त्यावरूनही मावळ मतदारसंघासाठी पवार-ठाकरे यांच्यात राजकीय सेटिंग झाल्याची चर्चा पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि भाजपचा विरोध पार्थ पवार यांच्या पथ्यावर पडावी यासाठीच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याचे म्हटले जात आहे. काय खरे आणि काय खोटे हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.